निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरजवळील खेर्डा भागाई गावातील वडिलोपार्जित जमीन बळकावण्यासाठी भावाने आई व एका बहिणीशी संगनमत करून दोन तोतया बहिणी दुय्यम निबंधक कार्यालयात हजर करून आणि त्यांचे बनावट आधारकार्ड, बनावट स्वाक्षरींच्या आधारे वडिलोपार्जित संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला. परंतु बहिणींनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर दुय्यम निबंधकांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पिंजरजवळील खेर्डा भागाई येथील देवराव सदांशिव यांचे निधन झाल्याने, त्यांच्या मालमत्तेवर कायद्याने मृताची पत्नी अंजनाबाई, मुलगा राजपाल, कीर्तीराज व मुली अनिता, मीना व सुनीता यांचा हक्क आहे. परंतु देवराव सदाशिव यांचा मुलगा राजपाल, कीर्तीराज, आई अंजनाबाई आणि मुलगी अनिता यांची वडिलोपार्जित संपत्तीवर नजर असल्याने, त्यांनी त्यांच्या दोन्ही बहिणी मीना आणि सुनीता यांना अंधारात ठेवून त्यांचे आधारकार्ड व फोटो वापरत बनावट साक्षीदारांच्या साहाय्याने तोतया महिलांना उभे करीत, दोन्ही बहिणींचा हक्क सोडण्याचा बनावट लेख दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केला. या प्रकाराची माहिती झाल्यावर दोन्ही बहिणींनी दुय्यम कार्यालय निबंधक कार्यालय बार्शीटाकळी येथे जाऊन चौकशी केली आणि ज्यावेळी हक्क सोडणीचे लेख नोंदणीकृत करण्यात आले त्यावेळी दोघी बहिणी हजर नव्हतो. ज्या महिला आपल्या जागेवर उभ्या केल्या त्या बनावट महिला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व घटनाक्रम दुय्यम निबंधकांच्या लक्षात आणून दिला. या दस्तऐवजावरील सह्यासुद्धा आपल्या नसून त्या बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलोपार्जित संपत्तीचा हक्क मिळू नये, याकरिता कटकारस्थान भावाने, आईने, आणि बहिणीने रचले असल्याची तक्रार या दोन्ही बहिणींनी दुय्यम निबंधक यांच्याकडे केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत दुय्यम निबंधक भा. स. गुळवे यांनी अंजनाबाई देवराव सदांशिव, राजपाल देवराव सदांशिव, कीर्तीराज सदांशिव, अनिता रमेश निशानराव, साक्षीदार सागर भगत, विजय खंडारे यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
तोतया बहिणी उभ्या करून व बनावट दस्तऐवज सादर करून संपत्ती हडपण्याबाबत दुय्यम निबंधकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-प्रकाश पवार, ठाणेदार बार्शीटाकळी
खेर्डा भागाई येथील लोकांनी तोतया बहिणी उभ्या करून हक्क सोडणीचे बनावट खत तयार केले. याबाबत माझ्याकडे बहिणींनी तक्रार केली. त्यानुसार बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
-भा. स. गुळवे, दुय्यम निबंधक