‘कापूससाठी दाेन हजार बाेनस द्या !’
अकाेला : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानभरपाईपाेटी राज्य शासनाकडे कापूस आधारभूत किमतीपेक्षा मूळ किमतीवर दोन हजार रुपये बोनस देण्याची मागणी मांजरी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बांधकाम साहित्य जप्त करा !
अकोला : संपूर्ण शहरात व्यावसायिक संकुलांसह घरांचे बांधकाम हाेत असून, संबंधित मालमत्ताधारकांचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून आहे. यामध्ये रेती, गिट्टी, मुरूम आदी साहित्यांचा समावेश असून, दुचाकीचालक, सायकलस्वार यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सदर साहित्य मनपाने जप्त करण्याची मागणी हाेत आहे.
फतेह अली चाैकात वाहतुकीची कोंडी
अकोला : शहरात सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या फतेह अली चाैकात शुक्रवारी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यालगत ऑटाेचालकांसह फळ व रेडिमेड कापड विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. जुन्या बसस्थानकामधून येणाऱ्या प्रवाशांची या चाैकात माेठी वर्दळ राहते.
खुले नाट्यगृह चाैकात अनधिकृत थांबा
अकोला : शहरातील खुले नाट्यगृह चाैकात ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे दरराेज वाहतुकीचा खाेळंबा होत आहे. याठिकाणी थांबा नसताना मनमानीरीत्या ऑटाे उभे केले जात आहेत. ही बाब लक्षात घेता शहर वाहतूक शाखा पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
जनजागृतीसाठी मनपा सरसावली
अकाेला : मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता जनजागृतीसाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने झाेननिहाय पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेतला हाेता. नागरिकांनी सुद्धा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा
अकाेला : शहरातील प्रमुख मार्गांना अतिक्रमकांनी विळखा घातल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वर्दळीच्या ठिकाणी भाजी व्यावसायिक, फळविक्रेता, रेडिमेड कापड विक्रेत्यांनी ठाण मांडल्याचे चित्र असून, यामुळे वाहतुकीची काेंड हाेत आहे. अतिक्रमणधारकांना हुसकावून लावण्याची जबाबदारी असलेल्या अतिक्रमण विभागाला कर्तव्याचा विसर पडला आहे.
दुर्गा चाैक मार्गाची दुरवस्था; नागरिक त्रस्त
अकाेला : शहराच्या मध्यभागातील दुर्गा चाैक ते अग्रसेन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी भलेमाेठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती न करता मनपा कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी अकाेलेकरांनी केली आहे.