लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. पश्चिम विदर्भात सरासरी ३२ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केल्याने सर्वच स्तरावर कृषी निविष्ठा ते पेरणी, असे नियोजन करण्यात आले होते. तथापि, पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या. १५ जुलैपर्यंत राज्यासह विदर्भात ५0 टक्क्यांच्यावर पेरण्याची आकडेवारी सरकली नव्हती. १५ जुलैनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकर्यांनी आपत्कालीन पीक पेरणी केली आहे.१५ जुलैपर्यंत कापूस, तूर, सोयाबीन पिकाच्या पेरणीची ही वेळ होती; परंतु शेतकर्यांनी २५ ते २७ जुलैपर्यंत पेरणी केली. त्यामुळेच १५ जुलैनंतर ७ ते १0 दिवसांत ४0 ते ४५ टक्के पेरणी झाली आहे. पश्चिम विदर्भात पेरणीचा आकडा आजमितीस ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यात १५ ते २0 जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के पेरणी झाली होती. १५ जुलैनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्यांनी धाडसाने पेरणी केली. जवळपास या ७ ते ८ दिवसांत ४0 टक्क्यांच्यावर पेरणी करण्यात आली; पण तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. उशिरा पेरणी केलेली पिके ही दोन पानांवर आहेत. तापमानाचा मार सहन होत नसल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत.
१५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात ५0 टक्के घट येते, हे सूत्रच आहे. आठ दिवस पाऊस लांबल्यास १0 टक्के उत्पादनात घट होते, तसेच २0 ते २५ दिवस लांबल्यास ४0 टक्क्यांवर उत्पादनात घट होत असते. काही पिकात ही घट ३0 ते ४0 टक्के असते.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक (संशोधन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.