अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन ८ ते १0 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणावर हा तीन दिवसीय सोहळा होणार आहे. या महोत्सवात प्रबोधनकारांची व्याख्याने, भजनी मंडळांचे कार्यक्रम व इतर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. स्वराज्य भवनाच्या प्रांगणावर ५ जानेवारी रोजी सकाळी ९.३0 वाजता या महोत्सवाचे भूमिपूजन होणार आहे. आठ जानेवारी रोजी सकाळी सामुदायिक ध्यानाने या उत्सवाची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता राजेश्वर मंदिरापासून राष्ट्रसंतांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या दिंडीत आ. गोवर्धन शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, भाजप महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, दादा देशपांडे, हभप सोपान महाराज, नंदकिशोर पाटील, सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, सुभाष म्हैसने, सोनू देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२ वाजता ज्येष्ठ शेतकरीनेते आ. सैयद पाशा पटेल यांच्या हस्ते व अकोला कृषिउत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली या उत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. रणधीर सावरकर, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, महापौर उज्ज्वला देशमुख, भास्करराव पेरे पाटील, उपमहापौर विनोद मापारी, एकनाथराव दुधे, माजी आमदार बबनराव चौधरी, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, अँड. मोतीसिंह मोहता, माजी महापौर मदन भरगड, अशोक अमानकर, हभप आमले महाराज, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम तायडे आदी मान्यवर उपस्थित राहतील. महोत्सवात ९ जानेवारी रोजी सकाळी योग प्रात्यक्षिक व राष्ट्रीय भजन संमेलन होणार आहे. दुपारी राष्ट्रीय कीर्तन व महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सप्तखंजिरीवादक संदीपपाल महाराज यांचे प्रबोधन व रात्री राष्ट्रीय कीर्तन होईल. १0 जानेवारी रोजी सकाळी भजन संमेलन, दुपारी श्रीकृष्ण सावळे यांचे सामाजिक प्रबोधन व त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली युवक संमेलन होईल. रात्री राष्ट्रसंतांची भजन कव्वाली हा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता बालशाहीर अंकुर परिहार यांच्या पोवाड्यांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे. गुरुदेवभक्तांनी या सोहळय़ाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव ८ जानेवारीला
By admin | Published: December 30, 2015 1:58 AM