पातूर: येथून जवळच असलेल्या तुळजापूर धरणाच्या वितरिकेची नाली रस्त्याच्या खोदकामात बुजविण्यात आल्याने या वितरिकेवर अवलंबून असणारी शेकडो हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. याबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी तुळजाभवानी पाणी वापर संस्थेचे सचिव हाजी सय्यद बुऱ्हाण सय्यद नबी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील धरणे, प्रकल्प तुडुंब असल्याने यंदा रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. शहरापासून जवळच असलेल्या तुळजापूर धरणाच्या पाण्यावर दरवर्षी शंभर एकरावर सिंचन केले जाते. धरणे तुडुंब असल्याने पाणी मिळण्याच्या आशाने शेतकऱ्याने रब्बीची तयारी करून पेरणी केली आहे. दरम्यान, पातूर-वाशिम मार्गाचे काम सुरू असल्याने सर्व्हे नंबर ३०१/ ६ येथून खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे तुळजापूर धरणाच्या वितरिकेची नाली बुजवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेकडो हेक्टर रब्बी पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. (फोटो)
----------------------------
नाली बुजवण्याचे काम गैर कायदेशीर असून, मी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी देऊन पाठपुरावा केला आहे; मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
-अनिल राठोड
उपविभागीय अधिकारी पाटबंधारे, उपविभाग, अकोला.