नितीन गव्हाळे /अकोला : भारतीय संस्कृतीमध्येच काय, आयुर्वेदामध्येसुद्धा तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'तुलसी श्रीसखी शुभे पापहारिणी पुण्य दे' असे म्हटले जाते ते उगाच नाही. पूर्वी प्रत्येकाच्या घरासमोर सुंदरसं तुळशी वृंदावन असायचं. सकाळच्या प्रहरी तुळशीची पूजा होऊन घरात एकप्रकारचे धार्मिक वातावरण तयार व्हायचे; परंतु सध्याच्या काळात हे सर्व हरवत चाललं आहे. अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे. खरं म्हणजे, तुळशीचं हक्काचं अंगणच हरवलं आहे. लोकसंख्येच्या स्फोटात स्वतंत्र घरांचे अस्तित्व, घराची शोभा वाढविणारे तुळशी वृंदावन आणि एकूणच घरपण नष्ट होत चालले आहे. एकेकाळी हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला महत्त्व होते. वृंदावन नसलेले घर क्वचितच बघायला मिळे. तुळशी वृंदावन अंगणात असण्यामागे धार्मिक किंवा आयुर्वेदिक आधार होता. 'तुळशी वृंदावन जयाचे द्वारी।। धन्य तो प्राणी संसारी। तयाच्या पुण्या नाही सरी।। नित्य तो तुलसीस नमस्कारी।। त्यासी देखोनि यम पळे दुरी।। विष्णुदूत आदर करी।।' असे 'तुळशी माहात्म्य'मध्ये म्हटले आहे. साधारणत: १५-२0 वर्षांपूर्वीचा विचार केला, तर अंगणातील तुळशी वृंदावनासमोर महिला भगिनी दररोज तुळशीला पाणी घालत, प्रदक्षिणा घालून पूजा करीत असत. सायंकाळी दिवा लावला जायचा. अलीकडच्या काळात फ्लॅट संस्कृतीचा शिरकाव झाला. वाढत्या लोकसंख्येसाठी तरतूद म्हणून अपार्टमेंटसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. फ्लॅट संस्कृतीमध्ये दारासमोर अंगणच नसल्याने तुळशी वृंदावनाची संकल्पना बाजूला पडली. जुन्या काळी लोक घर बांधताना तुळशी वृंदावन आवर्जून उभारीत असत. अलीकडे तुळशीचे अंगणच हिरावून घेतले आहे. तुळशी वृंदावन संस्कृतीच आम्ही मोडीत काढली आहे.
*वृंदावन हरवलं अन् संस्कारही!
तुळशीचं वृंदावन तर हरवलंच, परंतु त्यासोबत लहान मुलांवरील संस्कारसुद्धा हरविले. घरातील आई, वडीलधारी माणसं सायंकाळी लहान मुलांना घेऊन तुळशीसमोर 'दिवा लागला तुळशीपाशी..', 'दिव्या दिव्या दीपत्कार..' यांसह धार्मिक श्लोक म्हणायला लावीत. अलीकडे हे सर्व नाहिसं झालं. वृंदावनासोबतच आमचे संस्कारसुद्धा हरवत चालले आहेत.
*आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य
वेद, पुराण, आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य सांगितले आहे. श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशी पानांनी विष्णूचे पूजन केले, तर व्रत, यज्ञ, जाप केल्याचे फळ लाभते. कृष्णपत्नी रुक्मिणीचा अवतार तुळस आहे, असे मानले जाते. म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह लावला जातो आणि या दिवसापासून विवाह मुहूर्त प्रारंभ होतात.