सदानंद खारोडे - तेल्हारायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या नाफेडच्या केंद्रावर अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी होत आहेत.अशातच नाफेडच्यावतीने २०१४ मध्ये मयत झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर २२ एप्रिल २०१७ रोजी तुरीची मोजणी मोजल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतच्या हाती आलेल्या पावत्यांवरून उघडकीस आला आहे. तूर खरेदी बंद होण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बाजार समितीने जवळच्या शेतकऱ्यांना पुरवणी टोकण दिल्याने आधी आलेले शेतकरी तूर मोजणीपासून वंचित राहिलेले आहेत. तेल्हारा बाजार समितीत नाफेडच्यावतीने तूर खरेदी करण्यात आली. तालुक्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने हजारो शेतकऱ्यांनी आपली तूर केंद्रावर विक्रीसाठी आणली, त्यामुळे बाजार समितीच्या यार्डमध्ये शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या. शेतकऱ्यांसाठीच असलेल्या या केंद्रावर काही व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या नावावर माल विकला आहे. बाजार समितीचा घोळ एवढ्यावरच थांबला नाही, तर २२ एप्रिल रोजी वाकोडी येथील मयत शेतकरी बळीराम सदाशिव येवले यांच्या नावावर १४ क्विंटल तुरीचे मोजमाप करण्यात आले.बळीराम येवले यांचे ३ आॅगस्ट २०१४ रोजीच निधन झाले आहे. तरीही बाजार समितीने त्यांच्या नावावर टोकन दिले आहे. तसेच माल विक्री करणाऱ्यांनीही त्यांच्या नावावर माल कसा विकला, याची चौकशी होण्याची गरज आहे. अर्धवट माहितीवर मोजमाप नाफेडमध्ये तूर आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशपत्रिका भरून घेते. त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गट क्रमांक, दाखला दिनांक अशी माहिती भरली जाते; परंतु बळीराम येवले यांचे टोकन क्रमांक ५९४ वरून पुरवणी टोकन म्हणून १८९ क्रमाकांचे टोकन देण्यात आले. या पावतीवर किती माल आणला, त्याची माहिती नाही. वाहनाचा क्रमांक एमएच २८ असा अर्धवट आहे. त्या माहितीवरच तुरीचे मोजमाप करण्यात आले, तसेच ७९४ क्रमांकाच्या एकाच टोकणवरून चार पुरवणी टोकण वितरीत करण्यात आले आहेत.