- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: दहा दिवस उलटूनही पालकमंत्री बच्चू कडू यांचे कट्टर समर्थक तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडात कुठलाही धागा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घटनेपासून तुषार यांचा मोबाइल सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे तुषारचा मोबाइल सुरू झाल्यास अनेक रहस्य व तपासाला दिशा देणारी माहिती बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोरांना पाहणारा एकही मुख्य साक्षीदार पोलीस तपासात निष्पन्न होऊ शकला नाही. हल्लेखोर व मुख्य सूत्रधार मोकाट असून, डम्पडाटा व हेरगिरीवरच तपासाचे दिवस निघत आहेत.अकोट शहर पोलीस वसाहतीत २१ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर याच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. घटनास्थळावर गावठी पिस्तूल, काडतूस व जखमी अवस्थेत पडलेला तुषार याव्यतिरिक्त घटनास्थळावर हल्लोखोरांनी कोणताही ठोस पुरावा सोडला नाही. हल्लेखोरांनी थेट पोलीस वसाहतीची भीती न ठेवता गोळ्या झाडल्या. घटनास्थळावर असलेली तुषारची चप्पल आढळली.तुषार मोबाइलवर बोलत दूध डेअरीवरून बाहेर निघाला. त्यानंतर गोळीबार होताच तुषारचा बंद मोबाइल अद्यापही सुरू झाला नाही. पोलिसांनी मोबाइल फिंगर प्रिंटवर उघडणार म्हणून अकोला येथे तुषारची बोटे लावून उघडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नसल्याचे समजते. त्यामुळे मोबाइल एक्सपर्ट व फॉरेन्सिस लॅबमधून अद्यापही हा मोबाइल उघडलाच गेला नाही काय, असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात शिरला आहे. तुषार यांच्या मोबाइलमध्ये हत्याकांडाला कारणीभूत काही धागेदोरे व अनेक गंभीर रहस्य दडलंय काय, याची उत्सुकता नागरिकांना आहे. मोठमोठे नेते यांच्या संपर्कात राहणारा तुषार पुंडकर संबंधीची माहिती स्थानिक पातळीवर डम्पडाटा व शहरात हेरगिरी करण्यातच पोलीस पथके गुंतल्याने विशेष प्रगती नसल्याची माहिती पुढे येत आहे.
काही जण ‘रडार’वरतुषार यांना जीवाने मारेपर्यंत तीन गोळ्या झाडण्यामागे निश्चितच मोठे कारण असल्याची चर्चा सर्वत्र आहे. पोलिसांना ठोस माहिती देण्यास कोणीही पुढे येत नसल्याने अज्ञात हल्लेखोरांची दहशतीची गडद छाया शहरात दिसत असून, काहीजण पोलिसांच्या रडारवर असून, त्यांची घरझडती घेतली. त्यांच्या घराजवळचे सीसी कॅमेरे तपासले असून, त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलाविण्यात येत असून, शहर न सोडण्याची ताकीद दिल्याचे समजते.