- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे नेहमी मित्रांच्या गराळ्यात राहत होते; परंतु २१ फेब्रुवारी रोजी रात्री ३९ मिनिटांच्या कालावधीत शुटरने तुषार यांना सावज करीत देशी कट्ट्याने गोळ्या झाडून हत्त्या केली. घटनेला ४८ तास उलटूनही आरोपींचा मागमूस नसला तरी सीआयडीसह पोलिसांचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.अकोट शहर पोलीस स्टेशननजीक दूध डेअरीवर तुषार हे नेहमी बसायचे. या ठिकाणी सहकाऱ्यांसोबच चर्चा भेटी-गाठी घेत असत. तर वेळेप्रसंगी मोबाइल वर आॅनलाइन चॅटिंग तर कधीकधी मोबाइलवर बोलत-बोलत पोलीस वसाहतजवळ अंधारात फिरत असत. घटनेच्या रात्रीसुद्धा तुषार पुंडकर यांच्यावर याच परिसरात हल्ला करण्यात आला. दरम्यान, सीआयडीसह व पोलीस प्रशासनाचे नेमलेले पथक, स्थानिक पोलीस यंत्रणा कसून बारीक तपास करीत आहे. शहरातील विविध मार्गांवरील सीसी कॅमेऱ्यांनी टिपलेल्या संशयास्पद हालचाली, दुचाकी व इतर घटनाक्रमाची पडताळणी केल्या जात आहे. राज्यात खळबळ उडवून देणाºया या घटनेचा तपास पोलीस यंत्रणेने गंभीरतेने घेतला आहे. रात्रंदिवस तपासात घटनेचे धागेदोरे जुळविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत; परंतु अद्याप तरी पोलिसांनी या तपासाबाबत अधिकृत उलगडा केला नसला तरी मात्र जनतेमध्ये अनेक तर्क-वितर्क चर्चिल्या जात आहेत.
रात्री ९.२१ वाजतानंतर पाहिले शेवटचे व्हॉट्सअॅपतुषार यांनी मोबाइलवर व्हॉट्सअॅपवर रात्री ९.२१ मिनिटांपर्यंत शेवटी पाहिले असल्याचे दाखवित आहे. त्यानंतर रात्री १० वाजता त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली. त्यामुळे रात्री ९.२१ ते १० या ३९ मिनिटांच्या कालावधीत मारेकºयांनी तुषारच्या हालचालीवर लक्ष ठेवत बेफिकीर असलेल्या तुषारला अंधारात गाठत असताना कदाचित शंका आल्याने जीव वाचविण्यासाठी पोलीस वसाहतीचा सहारा घेत असताना त्यांचा गेम केल्याचा अंदाज बांधल्या जात आहे.
बेफिकीर जगण्याचे स्टेटस!व्हॉट्सअॅपचे स्टेटसवर आमच्या मित्रांची ‘नजर’ आणि ‘जिगर’ वाघाची असते. म्हणून आमचे जगणे ‘बेफिकीर’ असते..!!, अशी वाक्ये लिहिली आहेत; परंतु २१ फेब्रुवारीची रात्र त्यांच्यासाठी बेफिकीरीची घात करणारी ठरली. घटनेच्या दिवशी त्यांची गाडी नादुरुस्त झाली. त्यामुळे ते कोणासोबत, कोणत्या गाडीने दूध डेअरीवर पोहोचले, शिवाय ९.२१ मिनिटांनंतर तुषार डेअरीवरून बोलत गेले, तो कॉल कोणाचा होता, याही प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.
घटनास्थळाची पुन्हा केली पाहणीतपास पथकाने रविवारी पुन्हा घटनास्थळाची व त्या लग्नाच्या रस्त्याची पाहणी केली. या परिसरातील लोकांकडून आरोपीच्या वर्णनाबद्दल काही माहिती मिळते का, याबाबतसुद्धा चर्चा करीत असल्याचे दिसून आले. तसेच तपासाच्या दृष्टीने तुषारचे नातेवाईक व काही संबंधितांचे बयान घेतल्या जात आहे. घटनास्थळावर मारेकºयांच्या गावठी कट्ट्याव्यतिरिक्त कुठलाही पुरावा आढळून आल्याने पोलीस यंत्रणेकरिता तपास आव्हानात्मक ठरत आहे.
हत्येच्या कारणांचा शोधहत्या राजकीय वैमनस्यातून, जुन्या वादातून बदल्याच्या भावनेने किंवा आर्थिक व्यवहाराच्या कारणांवरून झाली का, याची माहिती घेत तपास सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे, पोलीस स्टेशनला दाखल घटनेतील फिर्यादी व घटनेची माहिती चौकशीच्या दृष्टीने गोळा केल्या जात असल्याचे कळते.