- विजय शिंदेअकोट: प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष पदावरून बरखास्त झाल्यानंतर तब्बल एक महिना एका दिवसात तुषार पुंडकर यांची हत्या करण्यात आली. ‘वेट अॅण्ड वॉच’नंतर तुषार यांचे हत्याकांड घडल्याने ‘जिल्हाध्यक्ष पदही गेले अन् जीवही गेला’, अशी सर्वत्र जनभावना व्यक्त होत आहे. दुसरीकडे सात दिवस उलटूनही सुनियोजित कट उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे.प्रहार संघटनेत असताना प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना झाल्यानंतर तुषार पुंडकर यांच्याकडे अकोला जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यानंतर विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. दरम्यान, २० जानेवारी रोजी जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाड्या बरखास्त करण्यात आल्या. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार होती. जिल्ह्यातील काही मोठे नेते पक्षासोबत काम करण्यास तयार असल्याने त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढीकरिता प्रयत्न केले जाणार असल्याचे माध्यमाशी बोलताना स्पष्ट करण्यात आले होते. तुषार पुंडकर पदावर असताना राजकीय पटलावर तसेच इतर क्षेत्रात त्यांचा दबदबा वाढला होता. शिवाय, पुंडकर यांच्याकडे प्रहार पक्ष वाढीच्या नागपूर व वर्धा जिल्ह्याचीही संपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी होती.दरम्यान, २० जानेवारी रोजी तुषार पुंडकर जिल्हाध्यक्ष पदावरून बरखास्त झाल्यानंतर एका महिन्यात २१ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. पदावरून बरखास्त झाल्यानंतर तुषार हा अस्वस्थ जाणवत असल्याचे कदाचित त्याने सर्वच स्तरावर आपल्या सहकाऱ्यांकडे मन मोकळे केले असेल; परंतु तुषारची पक्षाप्रती एकनिष्ठता असल्याने त्याकडे सोपविण्यात आलेली सर्वच कामे करीत होता. अस्वस्थ असल्याने तो बंगळुरू येथे गेला होता. या ठिकाणी १८ फेब्रुवारी रोजी त्याने श्रीश्री रविशंकर यांची भेट घेतली होती. या ठिकाणी भारतातील धार्मिक जातीय राजकारणासह सामाजिक, राजकीय, बेरोजगारीबद्दल चर्चा केली. तसेच कास्ट नही राष्ट्र, ही नवीन संकल्पना घेतली असल्याची पोस्ट त्याने सोशल मीडियावर अपलोड केली.