एमआयडीसी पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात
पाच एलईडी टीव्ही जप्त
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी स्पोर्ट्स क्लब येथून सात एलईडी चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. या टोळीतील दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच टीव्ही जप्त करण्यात आल्या आहेत.
सिटी स्पोर्ट्स क्लब येथून ३२ इंचीच्या ७ एलईडी टीव्ही चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या चोरीचा तपास सुरू केला असता अकोट फाइलतील दुबेवाडी येथील रहिवासी अविनाश माणिकराव लांडगे वय २० वर्षे यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या टीव्ही चोरीची कबुली दिली. तसेच हा टीव्ही आडसळ फाटा येथील रहिवासी तुळशीराम अरबट याला विकल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी तुळशीराम अरबट यालाही अटक केली असून या दोघांकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या पाच टीव्ही जप्त केले आहेत. या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे, पोलीस कर्मचारी दयाराम राठोड, नीलेश भोजने, संतोष डाबेराव व एमआयडीसी पोलिसांनी केली.