निंबा फाटा : येथून जवळच असलेल्या कारंजा रम शेतशिवारातील मनोहर कोगदे यांच्या बारा एकर शेतातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नसून, शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. बियाणे, पेरणी खर्च, खते व फवारणीवर हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आली आहे. नुकसानग्रस्त भागात कृषी विभागाने सर्वेक्षण करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
कारंजा रम येथील रहिवासी मनोहर कोगदे यांनी कारंजा रम शेतशिवारातील गट क्र. ३३९ व ३३८ या १४ एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. वेळेवर खते व कीटकनाशकांची फवारणी केली. पिकाची अपेक्षित वाढ झाली. मात्र, सध्या त्यांच्या शेतात २ एकरवरील सोयाबीनला शेंगा लागल्या असून, उर्वरित १२ एकरातील सोयाबीनला शेंगाच नसल्याने हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात असून, कृषी विभागाने तत्काळ पाहणी करून मार्गदर्शन करावे, तसेच शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
---------------
माझ्या १४ एकरातील १२ एकर शेतातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नसून, हजारो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. कृषी विभागाने बियाणे कंपनीवर कारवाई करावी व नुकसान भरपाई द्यावी.
- मनोहर कोगदे, शेतकरी, कारजा रम.
--------------------
शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसानीने हतबल असताना सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ शेतात जाऊन मार्गदर्शन करावे. पीक विम्यासह बियाणे कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी.
- महेश चव्हाण, अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी.