आमदार निधीतील विकासकामे लांबणीवर
संतोष येलकर - अकोलाआमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ या वर्षात शासनामार्फत जिल्ह्यातील सात आमदारांना प्राप्त झालेल्या निधीपैकी सहा आमदारांचा मार्च अखेर अखर्चित राहिलेला २ कोटी ६६ लाख ७२ हजार ८७५ रुपयांचा निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला. अखर्चित निधी शासन खात्यात जमा करण्यात आल्याने, सहा आमदारांच्या निधीतील प्रस्तावित विकासकामे लांबणीवर पडली आहेत.विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांना संबंधित मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. उपलब्ध निधीतून आमदारांकडून मतदारसंघात रस्ते, सामाजिक सभागृह, पाणीपुरवठा इत्यादी विकासकामांसोबतच शाळांना संगणक व शैक्षणिक साहित्य वाटप आणि राज्यस्तरीस क्रीडा स्पर्धांना सहाय्य करण्यात येते. त्यानुसार सन २०१६-१७ या वर्षात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सात आमदारांच्या निधी अंतर्गत शासनामार्फत १३ कोटी ३३ लाख ३३ हजार रुपयांचा निधी प्राप्त होता. उपलब्ध निधीपैकी जिल्ह्यातील सात आमदारांपैकी सहा आमदारांचा मार्च अखेर अखर्चित राहिलेला २ कोटी ६६ लाख ७२ हजार ८७५ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागामार्फत शासनाकडे समर्पित करण्यात आला. उपलब्ध निधीतून विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर विकासकामे यंत्रणा स्तरावर निविदा प्रक्रियेत असल्याने तसेच संबंधित यंत्रणांकडून निधीची मागणी करण्यात आली नसल्याने, आमदार निधीतील अखर्चित निधी मार्च अखेर शासन खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे आमदार निधीतील प्रस्तावित विकासकामे लांबणीवर पडणार आहेत.निधी खर्च करण्यात आ.भारसाकळे सर्वात मागे !आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीपैकी शासनाकडे समर्पित करण्यात आलेल्या आमदारांच्या अखर्चित निधीची आकडेवारी बघता, जिल्ह्यातील सात आमदारांपैकी सर्वाधिक अखर्चित निधी आमदार प्रकाश भारसाकळे यांचा आहे. त्यांच्या निधीतील अखर्चित ८९ लाख ६६ हजार १८० रुपयांचा अखर्चित निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला. त्यामुळे निधी खर्चात जिल्ह्यातील आमदारांमध्ये आ.भारसाकळे सर्वात मागे असल्याचे स्पष्ट होत आहे.निधी परत मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर !आमदार स्थानिक कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सहा आमदारांचा अखर्चित निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला आहे. समर्पित करण्यात आलेला निधी सन २०१७-१८ या वर्षात खर्च करण्यासाठी परत मिळावा, याबाबत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागामार्फत ११ एप्रिल रोजी शासनाच्या नियोजन विभागाकडे सादर करण्यात आला. अखर्चित निधी परत मिळाल्यानंतर आमदार निधीतील प्रस्तावित कामे मार्गी लागणार आहेत.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील सहा आमदारांचा अखर्चित राहिलेला निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला. समर्पित करण्यात आलेला निधी परत मिळण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.-ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा नियोजन अधिकारी