संतोष वानखडे / वाशिम भ्रष्टाचाराविरूद्ध अख्खा देश पेटलेला असतानाही, भ्रष्टाचार व लाचखोरी कमी होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. एकट्या अमरावती विभागात गतवर्षीच्या तुलनेत लाचखोरीच्या प्रकरणात अडीचपट वाढ झाल्याची साक्ष अमरावती विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आकडेवारी देत आहे. गतवर्षी जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१३ पर्यंत ३३ सापळे यशस्वी झाले होते. यावर्षी जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१४ पर्यंत ७७ सापळे यशस्वी झाले आहेत.लाच देणे आणि घेणे दोन्हीही बाबी कायद्यात बसणार्या नाहीत. तरी देखील लाचेचा व्यवहार अव्याहतपणे सुरू असल्याचे कारवाईवरून दिसून येते. लाचेच्या मागणीला कंटाळून किंवा लाचखोरांना धडा शिकविण्यासाठी अर्जदार हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवितो. प्राप्त तक्रारीवरून कारवाई केली जाते. जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१३ या दरम्यान अमरावती विभागात ३३ सापळे यशस्वी झाले होते. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १0 सापळे अकोला जिल्हयात तर सर्वात कमी ४ सापळे यवतमाळ जिल्हयात यशस्वी झाले आहेत. २0१४ मध्ये हा आकडा जवळपास अडीच पटीने वाढला आहे. जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१४ पर्यंत अमरावती विभागात एकूण ७७ सापळे यशस्वी झाले. ७७ सापळयातून ७१ जणांवर कारवाई करण्यात आली. गतवर्षी सर्वात कमी असलेल्या यवतमाळ जिल्हयात यावर्षी सर्वाधिक २0 सापळे यशस्वी झाले आहेत. वाशिममध्ये १0, अकोला १४, अमरावती १९, बुलढाणा १४ अशी यशस्वी सापळयांची आकडेवारी आहे. २0११ मध्ये भ्रष्टाचार व लाचखोरीच्या विरोधात अख्खा देश टिम अण्णाच्या नेतृत्वात पेटून उठला होता. लाचखोरी कमी होई असे वाटत असतांनाच , चित्र मात्र उलटे झाले. पूर्वीच्या तुलनेत लाचखोरांची संख्या वाढत आहे. लाचखोरीचा आलेख वाढला असल्याने अमरावती विभागातील उदाहरण प्रातिनिधक स्वरूपातील आहे. राज्यात सर्वत्रच लाचखोरीच्या सापळयात वाढ झाली आहे.
लाचखोरीत अडीच पटीने वाढ
By admin | Published: August 08, 2014 11:32 PM