राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मॉल अन् तोही रस्त्यावर..हे वाचून जरा विचित्रच वाटले असेल; पण हे सत्य आहे. अकोल्यातील गोरक्षण रोडवर एका भाजीपाला विक्रेत्या युवकाने चक्क ‘व्हिजिटेबल मॉल’ची पाटी लावून रस्त्यावर हिरवागार व ताजा भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना ‘डिजिटल वॉलेट’ द्वारे पैसे देण्याची सोय, फोन केला तर आहे त्याच भावात घरपोच भाजीपाला पोहचविण्याची व्यवस्था, अशा अभिनव कल्पनेमुळे हा ‘व्हिजिटेबल मॉल’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रणजित सिकची या २२ वर्षाच्या युवकाची ही भन्नाट कल्पना. रणजित याचे वडील सुरेशचंद्र हे एमआयडीसीमध्ये कामाला जात. भाड्याच्या घरात वास्तव्य, आई अन् लहान भाऊ अशा कुटुंबात हाता-तोंडाची गाठ पडण्यासाठी सर्वांनाच काम करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्थिती. बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या शोधात रणजितने अनेकांची दुकाने, कार्यालये झिजवली. पाच ते दहा हजारापर्यंत नोकरी मिळण्याची त्याला आशा होती; मात्र एवढय़ा पगारात घर कसे चालेल, ही चिंता असल्याने त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. एक हातगाडी भाड्याने घेऊन काही प्रमाणात भाजीपाला हर्रासीमधून विकत घेत अकोल्याच्या रस्त्यावर तो फिरू लागला. दोन-चारशे रुपयांचा व्यवसाय व्हायचा; पण त्यामध्ये पायपीट अन् ग्राहकांनी केलेली थट्टाच जास्त. त्यामुळे आपण कुठेतरी भाड्याची जागा घेऊन दुकान थाटले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. एका मित्राच्या ओळखीने त्याला गोरक्षण रोडवर असे दुकान टाकण्यासाठी जागा मिळाली. पायपीट थांबली, हक्काचे दुकान झाले, ग्राहकही वाढले. रोजची मालाची खरेदी-विक्रीही वाढली; पण या व्यवसायामध्ये नफ्याची शक्यता फार मोठी नसल्याने जेवढी जास्त विक्री तेवढाच जास्त फायदा, असे सूत्र आहे. नेमके हे सूत्र रणजितला गवसल्यामुळे त्याने विक्री वाढविण्यासाठी थेट घरपोच सेवा सुरू केली. फोन करा, भाजीपाल्याची ऑर्डर सांगा, माल अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या घरपोच. यामुळे त्याचे ग्राहक वाढले. कुठलेही वाढीव शुल्क न आकारता रस्त्यावर जो भाव आहे त्याच भावात घरपोच भाजीपाला मिळत असल्याने रणजितच्या या मॉलचे ग्राहक दिवसेंदिवस वाढतेच आहेत. येणार्या काळात थेट शेतकर्याकडूनच माल विकत घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आपल्या सोबतच शेतकर्यांचाही फायदा झाला पाहिजे हा त्याचा मानस त्याच्यामधील विचारांची उंची अधोरेखित करीत आहे.
व्हॉट्स अँपद्वारेही करतो विक्रीव्हॉट्स अँप हे केवळ मनोरंजन व टाइमपासचे साधन न ठेवता त्याने आपल्या व्यवसायाला व्हॉट्स अँपची जोड दिली आहे. ग्राहकांनी व्हॉट्स अँपवर भाजीपाल्याची ऑर्डर नोंदविल्यावर त्यांना किती वेळात भाजीपाला घरपोच केला जाईल, याची माहिती देऊन घरपोच डिलिव्हरी केली जाते.
डिजिटल वॉलेटद्वारा पेमेंट करण्याची व्यवस्थाग्राहकांकडे रोख रक्कम नसेल तर डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करण्याची सोय रणजितच्या मॉलमध्ये आहे. दररोज किमान आठ ग्राहक डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करून भाजीपाला विकत घेत आहेत. ऑनलाइन व्यवहाराच्या वाढत्या स्वरूपामुळे ही संख्या अधिक वाढेल, असा विश्वास रणजितला आहे.
लवकरच अँप अन् पोर्टलही तयार करणार! रणजितने आपल्या या मॉलला आधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. स्वत:चे अँप व पोर्टल तयार करून त्याद्वारे ग्राहकांना थेट सेवा देण्याचाही त्याचा मानस आहे.