अकोला: महिलेच्या गर्भात जुळी बालके असल्याचा सोनोग्राफी अहवाल येऊन प्रत्यक्षात मात्र एकच बाळ होण्याचा दुर्मिळ प्रकार शुक्रवारी रात्री येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शुक्रवारी रात्री घडला. हा सर्व प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी तपासणी दरम्यान चुकीच्या निरीक्षणातून झाल्याचे समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.स्थानिक सोनटक्के प्लॉट भागातील एका गर्भवती महिलेस जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग)मध्ये प्रसूतीसाठी शुक्रवारी भरती करण्यात आले. यापूर्वी करण्यात आलेल्या प्रसूतीपूर्व सोनोग्राफी तपासणीत सदर महिलेच्या गर्भात जुळी बालके वाढत असल्याचा अहवाल ‘लेडी हार्डिंग’मधील डॉक्टरांनी दिला होता. शुक्रवारी सदर महिलेची प्रकृती पाहता तिला प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. रात्री उशिरा डॉ. नेहा अग्रवाल यांनी सदर महिलेचे ‘सिझेरियन’करून प्रसूती केली. अहवालात जुळ्या बालकांचा उल्लेख असल्याने प्रत्यक्षात एकच बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तत्काळ महिलेच्या नातेवाइकांना शस्त्रक्रियागृहात बोलावून हकीकत सांगितली. यावेळी नातेवाइकांनी थोडा वेळ गोंधळ घातला. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी तांत्रिक कारणांमुळे सोनोग्राफीत चुकीचे निरीक्षण नोंदविले गेले असावे, असे सांगितल्यानंतर नातेवाईक शांत झाले.यापूर्वी २००३ मध्ये घडला होता प्रकारमहिलेच्या गर्भाशयात जास्त प्रमाणात गर्भजल असल्यास सोनोग्राफीचे निरीक्षण करताना गफलत होऊ शकते. यातूनच हा प्रकार झाला आहे. कधी-कधी गर्भात तीन बालके असाताना सोनोग्राफीत केवळ जुळी असल्याचे दिसते; परंतु जुळी बालके दिसत असतानाही प्रत्यक्षात एकच बालक असल्याचा प्रकार दुर्मिळ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी २००३ मध्ये असा प्रकार घडला होता, असे प्रसूती व स्त्रिरोग विभाग प्रमुख डॉ. श्याम सिरसाम यांनी सांगितले.