लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हरिहरपेठेतील गाडगे नगरात राहणारा विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे (३२) याची आर्थिक व्यवहाराच्या वादातून चौघांनी २६ जून रोजी निर्घृण हत्या केली आणि फरार झाले. जुने शहर पोलिसांनी चौघांपैकी नितीन शाहू, करण शाहू यांना गुरुवारी सायंकाळी मूर्तिजापूर येथून अटक केली. आरोपी राजेश काटोले आणि चेतन शाहू हे फरार आहेत. हरिहरपेठेतील गाडगे नगरात राहणारा विकास खपाटे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हत्या प्रकरणातही त्याचा समावेश होता. विकास हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. २६ जून रोजी दुपारी विकास खपाटे हा गाडगे नगरातील सार्वजनिक शौचालयातून बाहेर येताच, त्याच्यावर आरोपी चेतन शाहू, करण शाहू, नितीन शाहू आणि राजू काटोले यांनी आपसी वादातून धारदार कुऱ्हाड व लोखंडी पाइनने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला आणि त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारंजा, नागपूर, अमरावती येथे पोलीस पथके पाठविली होती. जुने शहर पोलिसांनीही आरोपींच्या शोधासाठी बाहेरगावी पथके पाठविली. गुरुवारी हत्याकांडातील आरोपी नितीन शाहू, करण शाहू हे मूर्तिजापूर येथे असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. जुने शहर पोलिसांनी त्यांना मूर्तिजापूर येथून ताब्यात घेतले. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. घटनेतील दोन आरोपी राजेश काटोले आणि चेतन शाहू हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
खपाटे हत्याकांडातील दोन आरोपी गजाआड
By admin | Published: June 30, 2017 1:27 AM