अकोला: औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये रुंगटा टायर्ससमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारंजा येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यासोबतच गोळीबारात मृत्यू पावलेल्या संतोष शर्मा यांच्या नातेवाइकांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली असून गुरुवारी रात्रीपर्यंत आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील श्रीहरी दालमिलमधून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपल्यानंतर दुचाकीने घराकडे जात असताना रुंगटा टायर्ससमोरच्या पहिल्याच वळणावर त्यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कानाजवळ व मस्तकावर देशी कट्टय़ाने गोळी झाडून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकर्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. बुधवारी दुपारी अकोला पोलिसांच्या एका पथकाने वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथून दोन जणांना संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. या दोन संशयितांसोबतच मृतक संतोष शर्मा यांच्याही काही नातेवाइकांची पोलीस चौकशी करीत आहेत. अनैतिक संबंधातूनच ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून त्याच दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
गोळीबारप्रकरणी दोन संशयितांची झाडाझडती !
By admin | Published: June 23, 2016 12:18 AM