अकोला : मध्य रेल्वेच्या भूसावळ ते भादली दरम्यान स्टिल प्लेट गर्डर ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामासाठी बुधवार, ३ मार्च रोजी डाऊन लाईनवर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अकोला, नागपूरच्या दिशेने येणाऱ्या दोन, तर भूसावळवरून उत्तरेकडे जाणाऱ्या दोन अशा एकूण चार गाड्यांवर परिणाम होणार आहे. या चार गाड्या विविध स्थानकांवर किमान ४५ मिनिटे ते २ तास थांबविण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
गाडी क्रमांक ०२८३३ डाउन अहमदाबाद-हावडा ही गाडी जळगाव स्टेशन येथे दोन तास थांबवली जाईल. ०९४८३ अहमदाबाद-बरोनी डाऊन ही गाडी पाळधी स्टेशन येथे दोन तास थांबवली जाईल. ०२२५९ डाऊन मुंबई-हावडा ही गाडी शिरसोली स्टेशन येथे ५० मिनिट थांबवली जाईल. तर ०२७७९ डाऊन वास्को निजामुद्दीन ही गाडी म्हसावद स्टेशन येथे ४५ मिनिट थांबविण्यात येणार असल्याचे भूसावळ मंडळाकडून सांगण्यात आले आहे.