अकोला: औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये रुंगटा टायर्ससमोर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले. बबलू सनोदिया व गोलू सनोदिया, असे आरोपींची नावे असून, त्यांना रविवारी दुपारी ४ वाजता अटक करण्यात आली. या आरोपींनी सुपारी घेऊन संतोष शर्मावर गोळय़ा झाडून त्याची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील श्रीहरी दालमिलमधून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपल्यानंतर दुचाकीने घराकडे जात असताना त्यांची देशी कट्टय़ाने गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवणी येथील रहिवासी बबलू ऊर्फ रामेश्वर सनोदिया (२२) व गोलू ऊर्फ ईश्वर सनोदिया या दोन आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींनी सुपारी घेऊन हत्या केल्याची माहिती असून, यामध्ये आणखी एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती आहे. या आरोपींकडून हत्येसाठी वापरण्यात आलेला देशीकट्टा व इतर साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, हत्येची कबुली देण्यास पोलिसांच्या चांगलेच नाकीनऊ आणत असल्याची माहिती आहे. अकोला ते मध्य प्रदेश दुचाकीने प्रवास ! दोन्ही आरोपींनी मंगळवारी रात्री दुचाकीने येऊन संतोष शर्मा यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. त्यानंतर आरोपींनी राष्ट्रीय महामार्गावर येऊन दुचाकीनेच थेट नागपूर गाठले व नागपूरवरून रात्रभर्यात दुचाकीनेच ते मध्य प्रदेशातील शिवणी जिल्हय़ात गेले. या आरोपींनी तब्बल ४00 किलोमीटरचा प्रवास दुचाकीने करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी या आरोपींना मोठय़ा शिताफीने अटक केली.
शर्मा हत्यांकाडप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक
By admin | Published: June 27, 2016 2:44 AM