तुकडोजी महाराज युवा मंच तालुकाध्यक्षपदी राऊत
बार्शीटाकळी : अ.भा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान युवा मंच विचार यांची बैठक सिंदखेड येथे पार पडली. या बैठकीत युवा मंच बार्शीटाकळी तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.
हाता येथील आठवडी बाजारात गर्दी
हाता : येथील रविवारी आठवडी बाजार भरतो; परंतु लॉकडाऊन असतानाही येथील बाजार भरला होता. बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ठाणेदार वडतकार यांनी बाजारात येऊन बाजार बंद केला आणि नागरिकांना ताकीद दिली.
गाव तेथे कोविड सेंटर उभारा
बोरगाव मंजू : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव तेथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजित तायडे यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
ऑनलाइन वधू-वर परिचय मेळावा
अकोट : संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा गठित मध्यस्थी वधू-वर सूचक मंडळाच्या पुणे विभागीय शाखा व मराठा समाजाच्या वतीने १ मे रोजी ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी २८ एप्रिलपर्यंत परिचयपत्र पाठवावे, असे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे, महादेव सावरकर, नीलेश म्हसाये यांनी कळविले.
ग्रामसचिवाच्या बदलीची मागणी
मूर्तिजापूर : ग्रामसचिवाची बदली करण्याची मागणी हातगावचे सरपंच व सदस्यांनी एका निवेदनाद्वारे केली. आहे. ग्रामसचिव पंकज गुजर यांची बदली करण्याची मागणी निवेदनातून सरपंच अक्षय राऊत, उपसरपंच वंदना अनभोरे, धीरज धबाले, नीलिमा चहाकर, सरला बोळे यांनी केली आहे.
किरकोळ वादातून इसमास मारहाण
मूर्तिजापूर : तालुक्यातील सांजापूर येथे गुरुवारी रात्री किरकोळ वादातून बाळकृष्ण भाऊराव डांगे (३०) याला अतुल प्रल्हाद माळवे (२५) याने काठी मारून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी अतुल माळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
थकीत पाणीपट्टी माफ करण्याची मागणी
आगर : ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी कर भरा, अन्यथा नळ कनेक्शन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून, पाण्याची अत्यंत गरज आहे. अशा परिस्थितीत थकीत पाणीपट्टी माफ करण्याची मागणी मन्साराम सिरसाट, रामदास सोनटक्के, रामदास भिसे, श्रीकृष्ण फुकट, दिनकर फुकट, मधुकर फुकट यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.