लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक व विक्री करणाऱ्या दोघांना दहशतवादविरोधी कक्षाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोट फाईल येथील रहिवासी सचिन नामदेव खोब्रागडे व दीपक नारायण रसाळ हे दुचाकीवरुन देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून त्याची विक्री करत असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाला मिळाली. या माहितीवरून दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी पथकासह नायगाव - शिलोडा मार्गावर पाळत ठेवून हे दोघे येताच त्यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून चार पेटी दारुचा साठा जप्त करण्यात आला तसेच दुचाकीही ताब्यात घेण्यात आली असून, एकूण ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध अकोट फाईल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.