बोरगाव मंजू (जि. अकोला) : पोलिस ठाणे हद्दीतील दापुरा येथे कोलार नाल्यात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. समर योगेश इंगळे (वय १२) व दिव्याशू राहूल डोंगरे (वय १४) अशी मृत बालकांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समर इंगळे व दिव्याशू डोंगरे हे अन्य दोन मित्रांसोबत घराबाहेर गेले होते. खेळता खेळता चौघेही गावाशेजारील कोलार नाल्यात उतरले. मात्र, पोहता न आल्याने समर व दिव्याशू पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेची माहिती सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगितली. ग्रामस्थ व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र धुळे, पोलिस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, किशोर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.