अकोल्यातील दोन सराफा मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:03 AM2020-09-04T11:03:37+5:302020-09-04T11:04:45+5:30
चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील दोन सराफांना विक्री केल्याच्या माहितीवरून मध्य प्रदेश पोलिसांनी अकोल्यातील दोन सराफांना गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मध्य प्रदेशातील इंदोर क्राइम ब्रांचने काही अट्टल चोरट्यांना अटक केली असून, या चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील दोन सराफांना विक्री केल्याच्या माहितीवरून मध्य प्रदेशपोलिसांनी अकोल्यातील दोन सराफांना गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. यामध्ये शेखर अग्रवाल व अजय गोयनका या दोन सराफांचा समावेश आहे.
इंदोर क्राइम ब्रांचने घरफोडी तसेच सोन्याचे दागिने व चांदी आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामधील काही चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील सराफांना विकल्याची माहिती क्राइम ब्रांचच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासादरम्यान दिली. यावरून इंदोर क्राइम ब्रांचचे एक पथक गुरुवारी रात्री अकोला दाखल झाले.
त्यांनी चोरीचे सोने खरेदी करणाºया राजेश ज्वेलर्सचा संचालक शेखर राजेश अग्रवाल व राजश्री ज्वेलर्सचा संचालक अजय हनुमानप्रसाद गोयनका या दोघांना सराफा बाजारातून ताब्यात घेतले. या दोन सराफांनी चोरीतील ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ४८० ग्रॅम चांदी खरेदी केल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली.
या माहितीवरून मध्य प्रदेश पोलिसांनी दोन्ही सराफांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.
या दोन्ही सराफांना ताब्यात घेण्यापूर्वी मध्यप्रदेश पोलीस अकोल्यात दाखल झाल्यानंतर त्यांची कायदेशीर नोंद त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला केली. तसेच या संदर्भातील माहिती सिटी कोतवाली ठाणेदार उत्तमराव जाधव यांनाही देण्यात आली.
त्यानंतरच अकोल्यातील दोन सराफांना ताब्यात घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील सराफा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.