अकोला : क्रेडाई महाराष्ट्र या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्यावतीने ६ व ७ जानेवारी २०२० रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी अकोल्यातील क्रेडाईचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जाणार आहेत, अशी माहिती क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष दिनेश ढगे यांनी दिली. राज्य पातळीवरील शिखर संघटनेतर्फे होऊ घातलेल्या अधिवेशनात क्रेडाईच्या तालुका आणि जिल्हास्तरीय ५७ शाखांमधून सुमारे ७०० बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी केलेली आहे.देश व राज्य पातळीवरील मंदीसदृश परिथितीमुळे गृहबांधणी क्षेत्रावर आलेल्या अडचणीवर भविष्यकालीन उपाययोजना आखणीसाठी हे अधिवेशन मोलाचे ठरणार आहे. महाकॉनचे हे आयोजन गत सात वर्षांपासून घेतले जात आहे. अत्याधुनिक बांधकाम प्रणाली, अद्ययावत कायदे, कर रचना, ग्राहक हित, आर्थिक शिस्त, व्यावसायिक बांधीलकी या व इतर अनेक मुद्यांवर मंथन होणार आहे.दोन दिवसीय महाकॉन-२०२० चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर युवा नेते कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, संचालक जक्षय शहा, उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, राकेश झुनझुनवाला, ग्यानवत्सल स्वामीजी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्हॉइस प्रेसिडेंट रचना भुसारी आदी वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास सचिव डॉ. नितीन करीर हे नवीन बांधकाम नियमावलीविषयी तर महारेरा चेअरमन गौतम चॅटर्जी हे रेराविषयी सर्वांना संबोधित करणार आहेत. राज्यातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टीने तसेच बांधकाम क्षेत्राच्या एकूण वाटचाल व नवीन तंत्रज्ञानाचा वापर यादृष्टीने हे महाकॉन-२०२० अत्यंत मोलाचे असल्याची माहिती अकोला क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष दिनेश ढगे, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख, मानद सचिव सुनील कोतवाल, गिरीश रायबागे, वसंत भद्रा व चिराग शहा यांनी दिली आहे.