अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी, हे दोन दिवस प्रवासी संख्या घटली होती. त्यामुळे शहरातील मध्यवर्तीय बस स्थानकातून एसटी बसेसची संख्याही कमी होती. याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला. या दोन दिवसांत ३६ बसेस १९ हजार किमी धावल्या. यातून महामंडळाला केवळ ५ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. अकोला आगाराला लॉकडाऊनपूर्वी ६-७ लाख रुपये दररोज उत्पन्न मिळत होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लावले. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली. त्यामुळे शहरातील आगारातून निम्म्या बस धावू लागल्या. एसटी बसेसची संख्या घटल्याने उत्पन्न घटले. मागील काही दिवसांपासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत रविवार व शनिवार कडक निर्बंध असल्याने अनेक प्रवाशांनी बाहेरगावी जाणे टाळले. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही कमी केल्या होत्या. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला आहे.
दोन दिवसांत नऊ लाखांचा तोटा
अकोला आगाराला एका दिवसाला सात लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न होत होते. दोन दिवसांत फेऱ्या घटल्याने एका दिवसाचे उत्पन्न अडीच लाखांवर आले आहे.
वीक एण्ड लॉकडाऊनमुळे शनिवारी केवळ ९.५ हजार किमी अंतर बस धावली. प्रवासी नसल्याने अनेक एसटी बसेस रद्द करण्यात आल्या. केवळ १७-१८ बसेस एका दिवसाला धावल्या.
दोन दिवसांमध्ये एसटी महामंडळाला नऊ लाखांचा तोटा झाला. तर दोन दिवसांत केवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असले तरी लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.
कार्यालयीन कर्मचारीही कमी
शनिवारी, रविवारी वीक एण्ड असल्याने बहुतांश कार्यालयीन कर्मचारी सुटीवर होते. तर जेवढे शेड्यूल होता तेवढे कर्मचारी कामावर होते. वाहनचालक व वाहक यांची ड्युटी लावण्यात आली होती. प्रवासी संख्यापाहून बसेस सोडण्यात येत असल्याने चालक व वाहकांला सुटी नव्हती.