अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, रविवारी (१६ जानेवारी) दोघांचा मृत्यू झाला, तर २९१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान, ९१ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना संसर्गाचा आलेख उंचावला असला, तरी या महिन्यात आतापर्यंत केवळ एक मृत्यूची नोंद झाली होती. रविवारी, अकोला शहरातील ५५ वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर शहरातील ८४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. दोघांनाही अनुक्रमे ९ व ११ जानेवारी रोजी उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या ६६० आरटीपीसीआर चाचण्यांपैकी २३१ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमध्ये २३ जण पॉझिटिव्ह आढळून आले, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
१५३२ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५९,७९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५७,११९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ११४५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. सद्यस्थितीत १५३२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.