महान(जि. अकोला), दि. ३- काटेपूर्णा प्रकल्पाच्या परिसरात १ व २ ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचा जलसाठा १00 टक्क्यांच्यावर पोहोचला होता. त्यामुळे महान धरणाच्या एक आणि दहा क्रमांकाचे गेट प्रत्येकी अर्धा फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दुपारी ४ वाजता दोन्ही दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी मालेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे, महान धरणाची पातळी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजता १00 टक्क्यांवर पोहोचली. पाणी विसर्ग करण्यासाठी उपविभागीय अभियंता मनोज बोंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर एक आणि १0 क्रमांकाचे गेट उघडण्यात आले. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजता महान धरणात ११४१.१0 फूट,३४७.७७ मीटर, ८६.३५द.ल.मीटर जलसाठा होता. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार धरणात ११४१ फूट पाणी पातळी ठेवावी लागते. त्यावरील पाण्याचा विसर्ग करावा लागतो. यापूर्वी २0१0 आणि २0१३ मध्ये महान धरणाचे गेट उघडण्यात आले होते. जलसाठय़ावर शाखा अभियंता ए.ए.सय्यद, एस.व्ही.जानोरकर, मनोज पाठक, शंकर खरात, नाना शिराळे, अकबर शहा, हातोलकर, शेषराव लुले, बहादरे, झळके आदी लक्ष ठेवून आहेत. २ ऑक्टोबरला रात्री ८ वाजतापासून जलसाठय़ात वाढ होत असल्याने सर्व कर्मचार्यांनी रात्र जागून काढली. जनरेटरच्या मदतीने उघडले गेट महान येथे वीज वितरण कंपनीच्यावतीने थ्री फेजवर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे वीज प्रवाह नसल्याने महान धरणाचे दोन्ही गेट उघडण्यासाठी जनरेटरची मदत घेण्यात आली. सध्या महान धरणाची पातळी १00 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे केव्हाही पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वीज कंपनीने २४ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे.
महान धरणाचे दोन दरवाजे उघडले!
By admin | Published: October 04, 2016 2:29 AM