अकोट : सातपुडा जंगलातील खटकालीनजीक असलेल्या पठार नदीच्या डोहातील पाण्यात दोघांचा बूडून मृत्यू झाल्याची घटना दि.२१ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेतील अ. नफीज अ. हमीद, शे. सुफियान शे. अमीन या दोघांचे नाव असून, ते अकोट येथील रहिवासी आहेत.
अकोट-धारणी मार्गावर पठार नदीत वाहते. या नदीमधील डोहातील पाण्यात दोघे जण आंघोळीसाठी उतरली होती. डोहातील खोल पाण्याचा अंदाज चुकल्याने दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहीती मिळताच पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन डोहातील पाण्यात शोध घेत मृतदेह बाहेर काढले. अब्दुल नफीज अब्दुल हमीद (१६) (रा. अकबरी प्लाॅट अकोट), तर शेख सुफियान शेख अमीन (१९) (रा.इप्तेखार प्लाॅट, अकोट) येथील रहिवासी असल्याची माहीती अकोट तहसीलदार निलेश मडके यांनी दिली. मुलाचे मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळ चिखलदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने माहीती कळविण्यात आली आहे. सध्या सातपुड्यात जोरदार अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यात, डोहात पाण्याची पातळी वाढली आहे. पोपटखेड धरणसुध्दा तुडुंब भरले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी, मुलांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.