कुरूम : पोलीस असल्याची बतावणी करून मोटरसायकलस्वारांना अडवून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी शनिवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी अटक केली.
समीर खान आसिफ खान (२४) वर्षे (रा.रोशनपुरा ता. मूर्तिजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चुलत बहिणीच्या लग्नाच्या कपड्याची ऑर्डर अमरावती येथे दिली असल्याने ते मित्रांसह मूर्तिजापूर-हिरपूर-बोर्टा-भातकुलीमार्गे अमरावतीला दुचाकीने जात होते. हिवरा कोरडे फाट्यासमोर सोमवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी आरोपी श्रीकृष्ण साहेबराव बुरघाटे (३४) (रा.हिवरा कोरडे), मंगेश उत्तमराव बुरघाटे ( ३६) (रा.शिवर अकोला) यांनी समीर खान यांना थांबवून आम्ही पोलीस आहोत तुझे लायसन्स दाखव, असे म्हटले. यावेळी लायसन्स नसल्यामुळे तोतया पोलीस आरोपींनी आम्ही तुझे चालान फाडतो, म्हणून सांगितले. यावेळी फिर्यादीने तोतया पोलीस आरोपींना १०० रुपये देऊन अमरावतीकडे जाण्यास निघाले. अमरावतीहून लग्नाचा बस्ता घेऊन परत सायंकाळी ६ वाजता दरम्यान आरोपींनी पुन्हा फिर्यादीस त्याच ठिकाणी थांबवून लायसन्स दाखव म्हणून सांगितले. यावेळी दोघेही आरोपी दारू प्यायले होते. यावेळी फिर्यादी समीर खान आसिफ खान यांनी तुम्ही पोलीस ड्रेसवर नसून, तुमचे आयकार्ड दाखवा, असे म्हटले. त्यानंतर आरोपी तोतया पोलिसांनी फिर्यादीसोबत हुज्जत घातली. या सर्व प्रकाराची फिर्यादीच्या मित्रांनी व्हिडीओ शूटिंग घेतली. याप्रकरणात दि. २७ फेब्रुवारीला दिलेल्या फिर्यादीवरून माना पोलिसांनी दोन्ही आरोपी श्रीकृष्ण बुरघाटे, मंगेश बुरघाटे याच्याविरोधात कलम १७०, ४१९, ४२०, ५०४,३४ आयपीसीनुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, मूर्तिजापूर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास माना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.पंजाबराव इंगळे, ना.पो.कॉ.नंदकिशोर टिकार, पो.कॉ.सचिन दुबे, जयकुमार मंडावरे करीत आहेत.