मूर्तिजापूर / विझोरा: जिल्ह्यात मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन तालुक्यात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या दोन घटना १३ तारखेच्या रात्री ते १४ ताखरेच्या दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मूर्तिजापूर येथील नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल रिझुमल जेठवानी यांच्या मालकीच्या दयारिझ अपार्टमेंटला १३ एप्रिलच्या रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या अपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र बँक, कृषी केंद्र आहे. वरील मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्याच्या खाली असणाऱ्याच्या विद्युत मीटर रूममध्ये १३ एप्रिल रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागून त्या ठिकाणी असलेल्या ८ मोटारसायकली आणि २ सायकली पेटल्या. त्यानंतर पाहता-पाहता आगीने उग्ररूप धारण केल्याने आग वरच्या माळ्यापर्यंत पोहोचली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग वेळीच आटोक्यात आणली; मात्र आगीमुळे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील मोखा येथे गावाशेजारी काका पाटील यांच्या शेतातील गवताने १४ एप्रिलच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास पेट घेतल्याने भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण करून ती गावाच्या जवळ पोहोचली. ग्रामस्थांनी समयसूचकता दाखवित आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून ती वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत दौलत डोंगरे या शेतकऱ्याच्या शेतातील पीव्हीसी पाइप व कुटार जळून खाक झाले. तसेच भेंडीच्या पिकाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती कळताच जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, जि.प. सदस्य प्रतिभा अवचार, जि.प. उपाध्यक्ष जमीरउल्लाखा, महिला बालकल्याण सभापती देवकाबाई पातोंड, प्रभाकर अवचार, दिनकर पातोंड, शैलेष सोनोने, सरपंच माणिक पवार, उपसरपंच नितीन डोंगरे, धर्मानंद डोंगरे आदींनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अग्निशामक दलाला बोलावले असता कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा बोलली. जि.प. अध्यक्ष वाघोडेंनी संपर्क साधल्यावर अग्निशामक दल चार तासांनी घटनास्थळी पोहोचले. ही आग विजविताना प्रमोद खांबलकर व सुदीप पातोंडे हे जखमी झाले. गावकऱ्यांनी आग विजविण्यासाठी मोठी मदत केली.