अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केले. आता पक्षातून विश्वासार्हता संपल्याने या दोन्ही पक्षात असलेल्या पदांचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदारद्वय हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिका-यांनी शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले आहे. वंचित बहुजन आघाडीला आयोगाची मंजुरी मिळाल्याच्या अवघ्या ४० दिवसांतच पक्षाला भगदाड पडले आहे. लोकसभा, विधानसभा तसेच काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काही प्रकरणांवरून पक्षातील काही नेत्यांमध्ये खदखद होती. ती राजीनाम्याच्या रूपाने बाहेर आली आहे.
राजीनामापत्र राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे देण्यात आले आहे. त्या पत्रावर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे, बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार इम्रान पुंजाणी, देखरेख समिती प्रमुख अर्जून सलगर, अॅड. हनुमंत वाघे, बुलडाणा लोकसभा संपर्क प्रमुख प्रा. सदानंद माळी, बापुसाहेब हटकर, जालना माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल रौफ, चंद्रकांत जानराव, औरंगाबाद लोकसभा संपर्क प्रमुख मुकुंद सोनवणे, नागपूर धनगर युवक अध्यक्ष रमेश पाटील, पुरुषोत्तम डाखोडे-नागपूर, अशोक जंगले-महाड, दिनकर नागे-अकोला, बिसमिल्ला खान-बार्शीटाकळी, विशाल पोळे-यवतमाळ, शेखर बंगाळे-सोलापूर,, शिवाजीराव ढेपले- निफाड, विनायक काळदाते-नाशिक, ज्ञानेश्वर ढेपले-नाशिक, सदाशिव वाघ-नाशिक, गणेश ढवळे-नागपूर, सुरेश मुखमाले-वाशिम, राजू गोरडे-वर्धा, संगीता तेलंग, सुनीता जाधव-इशान्य मुंबई, सागर गवई-मुंबई, प्रशांत चव्हाण, संजय आहेर, प्रकाश तुकाराम, के.एम.देवळे, देवेंद्र धोटे, भाऊराव गो-हाणे, विजय घावट, तुकाराम बघेल, सुमेध पवार, संदेश वानखडे-इशान्य मुंबई, संतोष इंगळे, अविनाश लोंढे, इश्वर शिंदे-भांडूप, आकाश सुरळकर-पवई, नागोराव शेंडगे-नांदेड, संतोष जानकर-पुणे, गणपत कुंदलकर-येवला, सुनील चिखले-निफाड यांचा समावेश आहे.
यासंदर्भात पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही, त्यामुळे या घटनेबाबत नो-कॉमेंटस, असे पक्षाचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहे.
माजी आमदारांनी पक्षाच्या नावे मिळत असलेली पेंशनही सोडून द्यावी, पक्ष सोडल्याने आता पेंशनचा मोह कशाला ठेवायचा, असे पक्ष प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले.