अकोला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडवाले प्लॉट व सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी असलेल्या तसेच जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या चार गुंडांचा समावेश असलेल्या दोन गुन्हेगारी टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने सोमवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ७० टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी शेख फारूख ऊर्फ शाहरूख शेख हुसेन (वय २८) व शेख इम्रान ऊर्फ सोनू शेख हुसेन (२८) हे दोघेजण व दुसऱ्या गुंडांच्या टोळीतील गुडवाले प्लॉट येथील रहिवासी अब्दुल गफार अब्दुल कादर (५९) आणि त्याचा साथीदार अब्दुल इम्रान अब्दुल गफार (२६) या गुंडांनी जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोन टोळ्यातील चार जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून जुने शहर पोलिसांनी या दोन टोळ्यातील गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली.
जुने शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या दोन्ही टोळ्यातील चार जणांनी टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोनही गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारी टोळ्यातील चार जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश सोमवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पाेलिसांनी केली.