मलकापूर (जि. बुलडाणा) : अभ्यासाला कंटाळून घर सोडून निघालेल्या अमरावती जिल्ह्यातील दोन तरुणींना रेल्वे सुरक्षा बलाच्या आरक्षकाने गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून ताब्यात घेतले. या दोन्ही युवतींना मलकापूर शहर पोलिसांच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रहिवासी असलेल्या दोन तरुणी इयत्ता बारावीत शिकतात. घरच्या मंडळीचा अभ्यासासाठी नेहमीच तगादा असतो, या कारणावरुन दोघीही ३0 जुलै रोजी घर सोडून मुंबईला जाण्यासाठी निघाल्या होत्या. दोघीही चेन्नई -अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बसल्या; मात्र त्यांनी मध्येच गाडी बदलून वर्धा-भुसावळ पॅसेंजर पकडली. सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्थानकावर उतरल्या असता त्यांना काही टवाळखोर मुलांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफार्म क्रमांक १ वर रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक रंजन तेलंग यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी दोघींनाही ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. सुरुवातीस त्यांनी बहिणी असल्याचे सांगितले; मात्र नंतर आडनाव सांगताना दोन्ही चुकल्याने संपूर्ण माहिती समोर आली.
अभ्यासाला कंटाळून पळालेल्या दोन मुली पालकांच्या स्वाधीन
By admin | Published: July 31, 2015 10:36 PM