अकोला : खडकी परिसरातील महिला राजगृहातून पळून गेलेल्या सहा मुलींपैकी दोन मुलींना खदान पोलिसांनी अहमदनगर व हडपसर (पुणे) येथून ताब्यात घेतले. दोन्ही मुलींना मंगळवारी राजगृह अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. प्राप्त माहितीनुसार, खडकी परिसरातील महिला राजगृहातून सहा मुली सप्टेंबर महिन्यात पळून गेल्या होत्या. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलींची शोधमोहीम सुरू केली. काही दिवसांतच पोलिसांनी यातील चार मुलींना खामगाव येथून ताब्यात घेतले होते, मात्र अद्यापही दोन मुलींचा शोध लागत नव्हता. खदान पोलिसांनी तपास मोहीम अहमदनगर, पुण्याच्या दिशेने सुरू केली. दरम्यान, मंगळवारी दोन्ही मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी प्रियकरांसह मुलींना ताब्यात घेतले. मुलींना महिला राजगृह अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवराव खांडेराव, महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता कराळे, पोलीस कर्मचारी गोपीलाल मावळे, महिला पोलीस कर्मचारी यशोदा पैठणकर, शैलेश जाधव, खुशाल नेमाडे आदींनी केली.
दोन्ही मुलींनी केला विवाह
महिला राजगृहातून पळून गेल्यावर सहा मुलींपैकी चार मुलींना काही दिवसांतच पोलिसांनी खामगाव येथून ताब्यात घेतले होते. मात्र, उर्वरित दोन मुलींनी प्रियकरांसोबत विवाह केला. त्यांच्याकडे विवाहाचे अधिकृत दस्तऐवज नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.