विझोरा (अकोला) : बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा येथून जवळच असलेल्या कातखेड येथे आज संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये जुन्या वैमनस्यातून वाद निर्माण होऊन तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील दहा जण जखमी झाल्याची झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमींना उपचाराकरिता जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बार्शीटाकळी व अकोला पोलीस दाखल होऊन गावात तणावपूर्ण शांतता आहे.कातखेड गावात आज एक लग्न सोहळा होता. पंगतीत वाढण्याच्या शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला, त्यातच दोन गटांमध्ये ब-याच दिवसांपासून वाद सुरू आहे, तो वाद आज विकोपाला गेला आणि दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक व पाईप, काठी याचा वापर केला. यामध्ये एक महिला रेखा भाऊसाहेब वानखडे व गावचे उपसरपंच डिंगबर चक्रनारायण यांच्यासह इतर आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे, पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी बोलवण्यात आली आहे.
कातखेड येथे दोन गटांत तुफान हाणामारी; दहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 10:00 PM