तेल्हारा : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, नागरिकांची चिंता वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार, तेल्हारा तालुक्यातील काळेगाव येथील येथील ५० वर्षीय पुरुष व हिवखेड येथील ५८ वर्षीय पुरुष, अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.
----------------
चान्नी परिसरात विजेचा लपंडाव !
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते.
---------------------------------
खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी
वाडेगाव : खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. शहरात मंगळवारी कृषी केंद्रांमध्ये खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
-----------------------------
फोटोग्राफी, बँड पथक कलावंतांवर उपासमारीची वेळ
पातूर : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याचा फटका लग्न समारंभांवरसुद्धा बसल्याने लग्नसमारंभाशी निगडित बँड पथक, फोटोग्राफी, मंगल कार्यालय, फुले व्यवसाय, घोडेवाले इत्यादी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़
----------------------
पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज
बाळापूर : टाकळी खुरेशी ते देगाव हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. खिरपुरी बु., खिरपुरी खु., टाकळी, नांदखेड, देगाव येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने येणे-जाणे करतात. पाणंद रस्त्यांची दैना झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
------------------
सिमेंटचे दर वाढले, सर्वसामान्यांना फटका
अकोट : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
---------------------
बाळापूर तालुक्यात आणखी १६ पॉझिटिव्ह
बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, मंगळवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यातील १६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
------------------------------
गृहरक्षक दलातील जवान वेतनाच्या प्रतीक्षेत
अकोला : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र सेवा देणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्यामुळे ते कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वेतन त्वरित देण्याची मागणी होत आहे.
----------------------
वन्यप्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव
बार्शीटाकळी : वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिसरात असलेल्या शेततलावातील पाणी आटल्याने प्राणी गाव-वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वन विभागाने पाणवठे निर्माण करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------
बार्शिटाकळी तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह
बार्शिटाकळी : गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला शहरी भागात रुग्ण आढळून येत होते. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
----------------------------
खाद्यतेलाचे दर आवाक्याबाहेर
अकोला : कोरोना संकटात अर्थव्यवस्था ढासळत असताना महागाई मात्र वरचढ होत आहे. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही. शासनाकडून योजनेचे पैसे मिळत नाहीत. अशा अवस्थेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र गगनाला भिडलेल्या आहेत. सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
------------------------------------
अवैध धंद्यांना ऊत; कारवाईची मागणी
तेल्हारा : कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारू दुकाने बंद आहेत. परिणामी मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जात असून, प्रत्येक गावात ही दारू सहज उपलब्ध होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
--------------------------------------------------
बार्शीटाकळी तालुक्यात रेती तस्करी जोमात
बार्शीटाकळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत तालुक्यातील लिलाव न झालेल्या घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------------------------------
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
बाळापूर : तालुक्यातील अनेक गावांतील स्मशानभूमीला रस्त्यांची समस्या आहे. ही समस्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दुरवस्थेतील स्मशानभूमी व रस्ते जिल्हा प्रशासनाने दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
----------------------------
शहरातील वॉड क्रमांक ३ परिसरात डासांचा प्रादुर्भाव
अकोला : शहरातील वाॅर्ड क्रमांक तीनमधील खरप बु. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात वराहांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन परिसरात फवारणी करण्याची मागणी होत आहे.