- संतोष येलकर
अकोला: कृषी विभागामार्फत यावर्षी पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या महाडीबीटी योजनेंतर्गत राज्यातील २ लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत यावर्षी महाडीबीटी योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे आणि ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून ‘महाडीबीटी’ पोर्टलव्दारे अर्ज करण्यात आले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी राज्यातील २ लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची लाॅटरी पध्दतीने गत फेब्रुवारीमध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे अनुदानासाठी २९ हजार ३९ आणि ठिबक, तुषार व इतर सिंचन सुविधा साहित्याच्या अनुदानासाठी १ लाख ७३ हजार १९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयामार्फत निवड करण्यात करण्यात आलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे आणि ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधा साहित्यासाठी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना लाभ देण्याची अशी आहे प्रक्रिया!
महाडीबीटी योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेतल्यानंतर योजनेंतर्गत मंजूर साहित्याची खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या साहित्याचे देयक ऑनलाईन पध्दतीने सादर केल्यानंतर संबंधित देयकाची कृषी विभागामार्फत तपासणी केली जाते व त्यानंतर महाडीबीटी पोर्टलव्दारे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.
महाडीबीटी योजनेंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे आणि ठिबक, तुषार व इतर सिंचन सुविधा साहित्य वाटपासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याचे देयक व संबंधित कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे.
- शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.