अकोला: किराणा व ढेप विक्रीचे दुकान बंद करून गुरुवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घरी जात असताना अज्ञात चार चोरट्यांनी दुकानदाराला अडविले आणि लोखंडी पाइपने मारहाण करून त्यांच्याकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.गुडधी येथील चाळीस क्वार्टर येथे राहणारे गणेश पुंडलिक देशमुख(३८) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे उमरी परिसरात धान्य भांडार, किराणा व ढेप विक्रीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय करून आलेली ६0 हजार रुपयांची रोख आणि ग्राहकांकडून वसूल केलेली १ लाख ४0 हजार रुपयांची रोख अशी एकूण २ लाख रुपयांची रोख घेऊन गणेश देशमुख हे रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास सायकलने घरी जात होते. त्यांच्यासोबत ओळखीचे मोहन कैथवास हे सुद्धा होते. दोघे बोलत जात असताना, कैथवास हे त्यांच्या घराच्या रस्त्याकडे वळले. काही अंतरावरील एका बारसमोर अनोळखी चार जण आले. त्यांनी देशमुख यांना अडविले आणि त्यांच्या डोक्यावर पाइपने मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या अंगावर सायकल ढकलून, त्यांच्याजवळील दोन लाख रुपयांची रोख असलेली थैली घेऊन पसार झाले. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)