खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा शेतशिवारात झालेल्या दोन बिबट्यांचा मृत्यू विजेचा जबर धक्का लागूनच झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. सहा महिन्याची कालावधी उलटूनही तपास करण्यात आला नाही.
पिंपळखुटा परिसरात लोखंडी विद्युत खांबाचा जबर धक्का लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. विद्युत खांबाच्या बाजूला मुंगूस मृतावस्थेत आढळून आल्याने मुंगसांची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात शिरल्याचे अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला होता. परंतु त्यावेळी एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समोर आले होते. बिबट्यांचा मृत्यू शॉक लागूनच झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला होता. परंतु त्या विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह नसल्याचा दावाही महावितरण विभागाने केला होता. बिबट्यांचा उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा होती. अखेर उत्तरीय तपासणी अहवालामध्ये विजेचा धक्का लागून बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोन बिबट्यांचा मृत्यू बाबत उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असून दोन्ही बिबट्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे समोर आले आहे. तपास सुरू आहे. तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल.
-धीरज मदने, वनपरिक्षेत्र अधिकारी पातूर
बिबट्यांना विजेचा शॉक देऊन ठार मारल्याची चर्चा
गेल्या काही महिन्यापासून पिंपळखुटा परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. बिबट्याने अनेक जनावरांवर सुद्धा हल्ला चढविला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभाग अपयशी ठरत असल्याने तसेच शेतकऱ्यांमध्ये असलेली दहशत काढण्यासाठी काही जणांनी बिबट्यांना विजेचा शॉक देऊन ठार मारल्याची चर्चा परिसरात आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही. थातूरमातूर चौकशी करून दोन वेळा घटनास्थळी भेट देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असून, चौकशी थंड बस्त्यात टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समिती गठीत करून चौकशी करण्याची गरज आहे.