अकोला: स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नोंदविताना संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांकसुद्धा नोंदवावा लागतो; परंतु अनेक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होतात. या दृष्टिकोनातून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आधार क्रमांक देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दोन आधार मशीन देण्यात येणार आहेत. तसेच मशीन वापराबाबत तज्ज्ञांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत.राज्यातील विद्यार्थ्यांची शाळेतील खरी पटसंख्या नोंदविली जावी, यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बंधनकारक केला आहे; परंतु अनेक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षकांना अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलमध्ये नोंद झाली नाही तर शाळेतील पटसंख्या कमी दिसते आणि शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येते. त्यामुळे शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांना आधार क्रमांक देण्यासाठी आधार मशीन देण्याचे नियोजित केले आहे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्यासाठी व मशीन वापराबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांसह संगणक प्रोग्रामरने उपस्थित राहावे आणि जिल्हा स्तरावर दोन समन्वयक नियुक्त करावेत. गटशिक्षणाधिकारी व प्रत्येक तालुक्याचे दोन आॅपरेटर, दोन तज्ज्ञ व्यक्ती व एक समन्वयकाने अशा सहा व्यक्तींनी प्रशिक्षण उपस्थित राहावे. प्रत्येक मनपाचे दोन समन्वयक व मनपातील प्रत्येक गट, प्रभागातून दोन आॅपरेटर व दोन तज्ज्ञ व्यक्ती व एक समन्वयक अशा पाच जणांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे. त्यासाठी प्रशिक्षणाचे स्थळ निश्चित करून संबंधितांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थ्यांना आधार क्रमांक देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दोन आधार मशीन मिळणार आहेत. त्यापूर्वी संबंधित तज्ज्ञाचे प्रशिक्षण घेण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, जिल्हा परिषद