संग्रामपूर (बुलडाणा): संग्रामपूर येथील इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांंचा तामगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात शोध लावला. दोन्ही मुलांचे अपहरण झाल्याच्या संशयावरून परिसरात चिंतेचे वातावरण होते. सुरज काशिराम उमाळे आणि शेख अजहर शेख मोहम्मद हे दोन विद्यार्थी ८ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले होते. पालकांच्या तक्रारीवरुन तामगाव पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. तामगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बेपत्ता मुलांचा शोध घेतला. सुरज उमाळे यास पालकांच्या मदतीने भुसावळ येथून सुखरुप आणण्यात आले. शेख अजहर मोहम्मद हा सुरत येथे त्याच्या वडिलांच्या राहत्या घरी गेला असल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले. तो संग्रामपूर येथे काकांकडे शिक्षणासाठी असून, त्यांच्या मदतीने त्यालाही संग्रामपूर येथे परत आणण्यात येत आहे. पोलिसांनी सुरज याला विचारपूस केली असता, तो मुंबईला फिरण्यासाठी गेला होता, असे स्पष्ट झाले.
संग्रामपूर येथील बेपत्ता दोन मुले सापडली
By admin | Published: August 10, 2015 11:11 PM