अकोला: तालुक्यातील तामशी येथील एका महिलेच्या घरात तिचा पती नसल्याचा फायदा घेत विनयभंग करणाऱ्या सदाशिव अंभोरे याला प्रथमश्रेणी न्यायालयाने दोन महिन्यांनी शिक्षा ठोठावली. यासोबतच आरोपीस दंडही ठोठावण्यात आला आहे.तामशी येथील एका महिलेचा पती सदाशिव अंभोरे याच्याकडे रोजंदारीने कामाला होता. २०१४ मध्ये पीडितेच्या पतीने काम सोडले होते. तरीसुद्धा आरोपी अंभोरे पीडितेच्या घरी चकरा मारत होता. पीडित महिलेचा पती एक दिवस घरी नसताना आरोपीने विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता त्याने मारहाण केली. या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ व ३२४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालतात दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा समोर आल्यामुळे न्यायालयाने आरोपीस दोन महिन्यांचा कारावास व ३२३ या गुन्ह्यात एक महिन्याचा कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील सीमा लोड यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून दानकरे यांनी कामकाज पाहिले.