मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ नकली सोने विक्रीच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातील व्यक्तींना पाच लाख ८० हजारांना लुटल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेतील तीन आरोपींचा शोध यापूर्वीच घेण्यात आला होता, १५ डिसेंबर रोजी आणखी दोन आरोपींना अटक करून त्यांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय नामक व्यक्ती पुण्यात मिस्री काम करीत होता. त्याने आपल्याकडे सापडलेले सोने असून, ते विकायचे सांगून पुणे जिल्ह्यातील चाकखडेवाडी येथील सुनील माहादू चापकर यांच्यासह काही लोकांना घेऊन तो मूर्तिजापूर येथे आला होता. पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे व्यवहार सुरू असताना घटनास्थळी पोलिसांच्या वेशात एका गाडीतून असलेल्या लोकांनी सुनील माहादू चापकर यांच्याकडील पाच लाख ८० हजार घेऊन पोबारा केला होता. पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करून २४ तासात सुनील जाधव (२५, राहा. सांगवा, जि. यवतमाळ), सूरज चौधरी (३१) व दीपक पटके (४०) दोघेही राहाणार सोमठाणा, ता. कारंजा यांना २६ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. या घटनेनेतील काही आरोपी अद्यापही फरार असून, त्यातील हिरालाल मोहिते (४०) व मोहन कान्हरकर (५०) दोन दिवस यांच्या मार्गावर राहून पोलिसांनी त्यांना अमरावती येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. बुधवारी दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, नागोराव भांगे, श्याम मोहाळे व रवि जाधव यांनी अमरावतीत दोन दिवस मागावर राहून त्यांना अटक केली.