महान (जि. अकोला) : येथे १८ जून रोजी स्थानिक बसस्थानकावर एका युवकावर झालेल्या सशस्त्र हल्ला व गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी २0 जूनपर्यंत अटक केली होती. या प्रकरणात सहभाग असलेल्या व घटनेनंतर पसार झालेल्या अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या शोधमोहिमेत २१ जून रोजी महान येथून एक व बाश्रीटाकळी येथून एक अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी घटनेनंतर रात्री महान येथील शे.मोबीन शे.मुनाफ, शे.जमील शे.मुनाफ, बाश्रीटाकळी येथील शे.रियाज शे.वहाब, शे.जहीर शे.जमील, तसेच शे.मोबीनचा दोन क्रमांकाचा मेहुणा व अन्य एका जणाविरुद्ध भा.दं.वि.चे ३0७, १४३, १४७, १४८, १४९, आर्म्स अँक्टचे ३/२५ व ४/२५ व बी.पी.अँक्टनुसार गुन्हा नोंदविला होता. हे सर्व आरोपी घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाले होते. यापैकी मुख्य आरोपी शे.मोबीन शे.मुनाफ याला पोलिसांनी १८ जूनच्या रात्री ३ वाजता अटक केली होती. त्याला न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. शे.मोबीनचा मेहुणा असलेला या प्रकरणातील दुसरा आरोपी शे.रियाज शे.वहाब याला पोलिसांनी २0 जून रोजी बाश्रीटाकळी येथून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना पिंजर पोलिसांनी रविवार, २१ जून रोजी शे.जमील शे.मुनाफ याला महान गावामधून तर शे.जहीर शे.जमील याला बाश्रीटाकळीतून अटक केली आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी शे.मोबीनचा दुसरा मेहुणा व अन्य एका जणास अटक होणे बाकी आहे. या हल्ल्यात शे.रियाजने गोळीबारासाठी वापरलेली बंदूक शोधून काढणे पोलिसांना अद्यापपर्यंत शक्य झालेले नाही. दरम्यान, पोलीस पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
आणखी दोन आरोपींना अटक
By admin | Published: June 22, 2015 2:15 AM