शहरात पक्षांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी जिल्हा बँकेच्या आवारात एक, तर अकोला बियाणी जिनिंगमध्ये एक असे दोन कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. गत आठ दिवसात जिल्हा बँकेच्या आवारात तीन तर जवळच असलेल्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात एक कावळा मृत अवस्थेत आढळून आला आहे. हा परिसर आठवडी बाजाराचा असून, बॅंक इमारतीच्या मागच्या बाजूलाच मांसविक्री केली जाते. त्याच ठिकाणी कोंबड्यांचे मांसही विकल्या जाते. त्याच कोंबड्यांचे वाया गेलेले मांस कावळे खात असल्याने आजारी पडत असून, त्यांचा मृत्यू होत असल्याचा तर्क लावण्यात येत आहे. यासंदर्भात पशुचिकित्सालयाला कळविण्यात आले असून, वनविभागाचे कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहेत. रोज पक्षी मृत व आजारी पक्षी सापडत असल्याने नागरीकांनी बर्ड फ्लू ची धास्ती घेतली आहे. याबाबत आपण दोन्ही कावळे तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, येथील नगर परिषद प्रशासनाला लेखी कळविले आहे. मासंविक्रेत्यांना मांस व पिसे याची योग्य विल्हेवाट लावून ते जमिनीत गाडावे, याविषयी सुचविले असल्याची माहिती सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. आर. बी. जावरकर यांनी दिली आहे. (फोटो)
मुर्तिजापुरात आणखी दोन कावळे मृतावस्थेत आढळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:20 AM