अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, या जीवघेण्या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २१ आॅगस्ट रोजी अकोला शहर व म्हैसपूर या गावातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४३ वर पोहचला आहे. आणखी दोन पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३६० वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १२५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी तब्बल १२३ निगेटिव्ह असून, केवळ दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण पुरुष असून, यापैकी एक जण नेहरु पार्क भागातील आहे. तर दुसरा रुग्ण अकोला तालुक्यातील कापशी या गावाचा रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.दोघांचा मृत्यूकोरोनाने शुक्रवारी आणखी दोघांचा बळी घेतला. यापैकी एक रुग्ण हा अकोला शहरातील बाळापूर नाका परिसरातील ७४ वर्षीय पुरुष असून, त्यांना १९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. बार्शीटाकळी तालुक्यातील म्हैसपूर येथील ४२ वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेस १७ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.३३७ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २८८० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३३७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोल्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; दोन पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:44 AM