अकोला: कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, शुक्रवारी आणखी ४५ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दोघांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६५० वर पोहोचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच शुक्रवारी आणखी दोघांचा बळी गेल्याने मृतकांचा आकडाही २९१ वर पोहोचला आहे. मृतकांमध्ये बार्शीटाकळी येथील ३५ वर्षीय रुग्णाचा समावेश असून, हा रुग्ण १३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. तर दुसरा मृत्यू अकोट तालुक्यातील जऊळखेड खुर्द येथील ४५ वर्षीय महिलेचा झाला आहे. ही महिला रुग्ण २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तर ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ३७ अहवाल आरटीपीसीआर, तर ८ अहवाल रॅपिड ॲन्टिजन चाचणीचे आहेत. आरटीपीसीआर चाचणीमध्ये आलेवाडी ता. अकोट व मोठी उमरी येथील तीन जण, सातव चौक, गजानन नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, राधे नगर, जयहिंद चौक, भागवत प्लॉट, कॉंग्रेस नगर, गोरक्षण रोड, अकोली जहागीर, दहातोंडा ता. मूर्तिजापूर, महागाव, शिवणी, जीएमसी व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच सायंकाळी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये मलकापूर येथील तीन जण, रणपिसे नगर येथील दोन जण, तर उर्वरित गोपालखेड, लक्ष्मी नगर, हिंगणा फाटा, खडकी, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
चौघांना डिस्चार्ज
शुक्रवारी ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक जण, आयकॉन हॉस्पिटलमधील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ८,३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.