अकोला: रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या मुलीच्या छेडखानीवरून दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी माळीपुरा परिसरात घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी एका गटाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल केले, तर दुसर्या गटातील युवकांवर विनयभंग व अपहरणाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले.नायगाव परिसरातील रहिवासी शेख मुज्जमील शेख अब्दुलाह व त्याचा मित्र इमरान या दोघांनी दोन अल्पवयीन मुलींची छेडखानी केल्याच्या कारणावरून या दोघांवर मो. शरीफ मो. रफीक, मो. अकबर मो. मोईन आणि मो. अमीन मो. रफीक या तिघांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३0७, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणामध्ये दाखल झालेल्या विरूद्ध गटाच्या तक्रारीनुसार, दोन अल्पवयीन मुली महाविद्यालयात जाण्यासाठी शनिवारी सकाळी निघाल्या असता, त्यांची शेख मुजम्मील शेख अब्दुलाह आणि इमरान खान कलीम खान या दोघांनी छेडखानी केली. त्यानंतर दोघांनीही या मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे त्यांच्यावर युवतींच्या भावांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ३६३ आणि ३५४ व पॉस्को अँक्टच्या कलम २ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
छेडखानीवरून दोघांवर प्राणघातक हल्ला
By admin | Published: April 10, 2016 1:35 AM