अकोला: मालमत्ता कर थकविणाऱ्या महानगरातील नागरिकांना आता कराच्या रकमेच्या दोन टक्के दंड दरमहा भरावा लागणार आहे. महापालिका अधिनियम परिशिष्ट प्रकरण ८ चे कलम ४१ नुसार ही कारवाई ३१ मार्च १७ पासून सुरू झाली असून, यापासून मात्र अकोलेकर बेदखल आहेत.अकोला महापालिकेने कर वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही म्हणून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी या कर विभागाचे वेतन थांबवून ठेवले होते. आंदोलनाची भाषा वापरल्याने अखेर या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले. महापालिकेच्या मालमत्ता घर मोजणीत काही मालमत्तांचा नव्याने समावेश झाला असून, मालमत्ता कराची आकडेवारी वाढली आहे. महापालिकेच्या नोंदीत अलीकडेच समाविष्ट झालेल्या मालमत्तांमुळे कराचा आकडा वाढणार आहे. या आकडेवारीनुसार ३१ मार्च १७ पर्यंत कर वसूल न झाल्याने अकोला महापालिकेने आता कारवाईचे शस्त्र उपसले आहेत. अकोला महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोनचे सहायक अधीक्षक आणि जप्ती पथकाच्या अधिकाऱ्यांना मालमत्ता कर थकविणाऱ्यांना दरमहा दोन टक्के दंड ठोठाविण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांनी कर थकविला आहे, त्यांना प्रतिमहिना कराच्या रकमेच्या दोन टक्के आकारण्याचे निर्देश आहेत. जे कर निरीक्षक दंडात्मक कारवाईच्या हिशेबाने दंड आकारणी करणार नाही, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अकोला महापालिकेच्या उपायुक्तांनी एका पत्रकान्वये दिले आहे. महापालिकेत अलीकडेच समाविष्ट झालेल्या गावांना या कारवाईतून तूर्त वगळण्यात आले आहे. महापालिकेची नोटिस मिळाल्यापासून मालमत्ता कर आकारणीत दंडात्मक कारवाई होणार आहे; मात्र पूर्वीपासून महापालिका कार्यक्षेत्रात असताना ज्यांनी कर थकविला आहे, त्यांना मात्र दरमहा दंड भरण्याशिवाय पर्याय नाही.- समाधान सोळंके, उपायुक्त, महापालिका अकोला.
मालमत्ता कर थकविणाऱ्यांना दरमहा दोन टक्के दंड
By admin | Published: April 24, 2017 1:48 AM